चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक ‘1098’ ठरतोय मुलांच्या समस्येवर समाधान

चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक ‘1098’

ठरतोय मुलांच्या समस्येवर समाधान

 चंद्रपूर, दि. 1 : महिला व  बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा चाईल्ड  हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन कार्यान्वित असून दोन  महिन्यात जिल्हयातील 75 मुलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये बालविवाह, बालशोषण, बालकामगार, बालभिक्षेकरी, निवाऱ्याची गरज असलेली,  हरवलेली बालके, समुपदेशनाची गरज, कौटुबिंक हिंसाचार पिडीत बालके आदी प्रकारच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला हाक दिलेल्या बालकांचा समावेश आहे.

चाईल्ड   हेल्पलाईन 1098 ही मोफत टेलिफोनिक सेवा आहे, जी 24 तास 7 दिवस कार्यरत असते. 0 ते 18 वर्ष वयोगटातील काळजी आणि  संरक्षणाची गरज असणारी बालके यांच्यासाठी आपली सेवा देत असते. 1098 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर हा फोन चाईल्ड हेल्पलाईन कंट्रोल रुमला जोडला जातो. यानंतर ज्या जिल्हयातून बालक  मदत मागतो आहे, त्या जिल्हयाला तुरंत जोडला जातो. यानंतर संबंधित जिल्ह्यातील चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी बालकापर्यंत 30 मिनिटाच्या आत पोहोचतात व त्या बालकाला प्रथमत: सुरक्षित ठिकाणी  हलवले जाते. बालकांचे पुर्नवसन होईपर्यंत बालकल्याण समिती बालकासोबत कार्य करत असते.

जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात जिल्हा चाईल्ड   हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन बालकांसाठी मोफत सेवा दिली जात आहे. वरीलप्रमाणे काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके आढळल्यास 1098 या ‍ जिल्हा चाईल्ड  हेल्पलाईन च्या टोल फ्री  क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.