चंद्रपूर ०१ जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेच्या १५ शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात आल्या असुन लवकरच या शाळांना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिली आहे.
मनपा शिक्षण विभागाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकास आढावा कार्यशाळा २८ जून रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त मंगेश खवले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी मनपा शाळांच्या गुणवत्तेत कश्या प्रकारे वाढ करता येईल याची चर्चा करण्यात आली. मनपाच्या सर्वच शाळांना भौतिक सुविधायुक्त करण्याचे प्रयत्न केले जात असुन पहिल्या टप्यात १५ शाळांना सुसज्ज करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात वृक्ष लागवड, परिसर सुशोभिकरण, इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती निर्मिती, घोषवाक्य, संदेश, सुविचार, दिशादर्शक फलक, डिजीटल क्लासरूम, संगणक प्रशिक्षण, ई-लर्निंग, शिस्तबद्ध शालेय रेकॉर्ड, सूचना व कौतुक पेटी, स्वच्छता आणि टिप्पणी, शिक्षक ओळखपत्र, गणवेश, स्वच्छ सुंदर वर्ग – परिसर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय यांसारख्या असंख्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत.शाळांचा निकाल यंदा ९८ टक्के लागला असुन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे १६ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळेच मागील वर्षापेक्षा पटसंख्येत वाढ होऊन ४०१३ विद्यार्थी मनपा शाळांत दाखल झाले आहेत.नव्याने सुरु होणाऱ्या ई-बस सेवेचा लाभही मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार असुन नुकतेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत मनपा शाळेने तृतीय क्रमांक मिळविल्याने आयुक्त विपीन पालीवाल यांनी या शाळेला २.५० लक्ष रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर केले.
मनपा शाळांचे विद्यार्थी हे दुर्बल घटकातील आहे,मात्र कॉन्व्हेंट स्तराचे शिक्षण या शाळांतुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भौतिक सुविधा महत्वाच्या असल्या तरी मिळणारे शिक्षण हे अधिक महत्वाचे असल्याने शिक्षकांनी जबाबदारीने आपले कार्य पार पाडण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले.याप्रसंगी प्रशासन अधिकारी नागेश नित,सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकगण उपस्थित होते.