गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडाण अंतर्गत एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडाण अंतर्गत एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

• ४६० स्पर्धकांची आठव्या फेरीपर्यंत चुरशीची लढत

• मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, ट्रॉफी, मेडल देऊन विजेत्यांचा सन्मान

गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत व अधिराज वेलफेअर फाउंडेशन, रोशन सर चेस अॅकॅडमी गडचिरोली, अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली व गडचिरोली जिल्हा अॅमॅच्युअर चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने आज दिनांक ३०/०६/२०२४ रोजी “अधिराज बुद्धीबळ चषक” एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील पांडू आलाम सभागृहामध्ये उत्साहात पार पडली.

सदर बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले. या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून ४६० प्रज्ञावंत बुद्धीबळपटूंनी आपला सहभाग नोंदविला. सदरची स्पर्धा ही तीन वेगवेगळ्या वयोगटात आयोजीत करण्यात आलेली असून त्यामध्ये १) खुला वर्ग, २) १५ वयोगटाच्या आतील, व ३) १० वयोगटाच्या आतील व ४) ०८ वयोगटाच्या आतील यांचा समावेश होता. प्रत्येक गटातील स्पर्धकांचे ०८ राऊंड घेण्यात आले. त्यामध्ये खुल्या गटात प्रथम- दिशांक सचिन बजाज, द्वितीय-आदित्य नरेंद्र ऊईके व तृतीय-शौनक बडोले यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे १५,०००/-, १०,०००/- व ७०००/- रु. रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, १५ वयोगटाच्या आतील गटामध्ये प्रथम-सहजविर सिंग मारस, द्वितीय-सार्थक मंगेश वासेकर व तृतीय-निहान पोहाने यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे १०,०००/-, ७०००/- व ५०००/- रु. रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, १० वयोगटाच्या आतील गटामध्ये प्रथम-वेद निरज पौर, द्वितीय परिस कुबडे व तृतीय-रुद्र ठावकर यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे ७०००/-, ५०००/- व ३०००/- रु. रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच ०८ वयोगटाच्या आतील गटामध्ये प्रथम-कनिष्क उमेश इंदूरकर, द्वितीय-वेदांत नितिन पुजारा व तृतीय युग बोंडे यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे ३०००/-, २०००/- व १०००/- रु. रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबतच बेस्ट सिनियर प्लेअर (५०+) प्रथम-प्रमोद धामगये व द्वितीय-ईश्वर रामटेके, बेस्ट यंगेस्ट बॉय (U5)- श्राव्यश्लोक, बेस्ट यंगेस्ट गर्ल (US) – ताश्वी धिरज जारोंडे व बेस्ट फिमेल प्लेअर (+15) प्रथम-हर्षिता कुचेरिया व द्वितीय- अरुणा धुंदले यांनी पटकाविला. या बुद्धीबळ स्पर्धेत एकुण ६१ बक्षिस वितरीत करण्यात आले असून या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागीताचे प्रमाणपत्र देण्यात आले. सदरची स्पर्धा ही सकाळी ०८.३० वा. सुरु होऊन सायंकाळी ०६.०० वा. सांगता करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटक श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये अशा स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच खेडाळू सहभागी झाले आहे. खेडाळूना संधी देण्याकरीता गडचिरोली पोलीस दल विविध स्पर्धा राबवित असतात. त्यामध्ये आता अधिराज वेलफेअर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बुद्धीबळ स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे आणि येथुन पुढे ही स्पर्धा मोठ्या स्तरावर आयोजन करण्याचे आमचे मानस आहे. यासोबतच स्पर्धकांच्या पालकांनी व स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेकरिता आलेल्या सर्व खेडाळू व पालकांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सदर बुद्धीबळ स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणुन अप्पलवार आय हॉस्पीटल, गडचिरोली यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला.

सदर बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, श्रीमती. अपूर्वा पाठक तसेच अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. वृषाली अप्पलवार, डॉ. अंकिता अप्पलवार, रोशन सर अॅकॅडमी गडचिरोली येथील स्पर्धा आयोजक श्री. रोशन सहारे, आंतरराष्ट्रीय आरबिट्रेटर (मुख्य परिक्षक) श्री. प्रविण पानतावणे व दिपक चव्हाण व त्यांची संपूर्ण टिम उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.