व्यायामशाळा / क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

व्यायामशाळा / क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन 2024-25 या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत या कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळा बांधकाम करणे यासाठी अनुदान देण्यात येते. तसेच व्यायाम साहित्य (इनडोअर) व ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) साहित्याचा पुरवठा पुरवठा धारकाकडून करण्यात येतो. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटरचा धावणमार्ग तयार करणे, विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी तयार करण्याकरीता संबंधित शाळा / संस्थेस अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जि.प. शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा इत्यादींनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव दि. 15 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा. विशेषत: गावातील नागरीकांना शारीरिक कवायतीकरीता लाभ पोहचावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळा (ओपन जिम) चे साहित्य प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विनाविलंब प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा.
सदर योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.