तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 28 : जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथीय असलेबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून आपले माहितीचे आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.