सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन
चंद्रपूर, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक न्याय भवनापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली यानंतर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. संजीव निंबाळकर, प्रा. विश्वानाथ राठोड, प्रा. कल्पना कवाडे तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून शपथ घेण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमात सामाजिक न्याय दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू घोले व श्री. तेटेवार यांना सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी प्रतिभा भागवतकार यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी मानले. यावेळी गणमान्य व्यक्ती व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येत उपस्थित होते.