‘मिशन शिखर’च्या माध्यमातून एमएस-सीईटी
मध्ये आदिवासी विद्यार्थांचे घवघवीत यश
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर अंतर्गत प्रकल्प विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2023-24 या सत्रात शासकीय /अनुदानित व एकलव्य रेसिडेंशियल स्कुल वसतीगृह येथील विद्यार्थ्यांकरीता ‘मिशन शिखर’ सुरु करण्यात आले. यामध्ये जेईई/ नीट/एमएससीईटी/नर्सिंग च्या विद्यार्थ्यांकरीता सराव वर्गाचे आयोजन करण्यात आले. नुकत्याच जाहीर झालेल्या एमएससीईटी च्या निकालात आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून 40 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
मिशन शिखर अंतर्गत जेईई प्रवेश परीक्षेत यापूर्वी पाच विद्यार्थी पात्र झाले. तर एमएससीईटी करिता एकूण 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 40 विद्यार्थी पात्र ठरले. पीसीएम ग्रुपमधुन आचल विजय मेश्राम (शासकीय आश्रमशाळा, देवाडा) हिने 75.52 टक्के गुण, किरण मंगल कुळसंगे 68.47 टक्के गुण तसेच पलक पुरुषोत्त्म कुळमेथे (शासकीय कन्या आश्रमशाळा, बोर्डा) हिने 67.68 टक्के गुण घेऊन यश संपादन केले. तसेच पीसीबी ग्रुपमधुन अनुक्रमे पायल बबन पुगांटी (अनुदानित आश्रमशाळा, राजुरा) 71.43 टक्के गुण , अमित दामु हिचामी (अनुदानित आश्रमशाळा, राजुरा) 62.79 टक्के गुण, अजित मंगरु वडे (अनुदानित आश्रमशाळा, गडचांदुर) 60.43 टक्के गुण घेऊन यश संपादन केले. नर्सिंगमध्ये आचल विजय मेश्राम 50.08 टक्के गुण, रुपा रामु कोवे यांनी 45.17 टक्के गुण घेतले.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेकरीता प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षण विभाग, एकलव्य देवाडा येथील शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच शासकीय/ अनुदानित आश्रमशाळेतील विषय शिक्षक यांचे सहकार्य लाभले. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आली होती. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सराव वर्गाचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थांना एमएस-सीईटी अंतर्गत पीसीएम/पीसीबी चे सराव वर्ग दररोज घेण्यात येत होते. तसेच जेईई/ नीट/एमएससीईटी/बी.एसस्सी नर्सिंग च्या पात्र विद्यार्थांचे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने समुपदेशन सत्र घेण्यात आले.
या यशाबदल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात प्रकल्प कार्यालयाच्या सहकार्याने आणखी यश मिळविण्याचा संकल्प विद्यार्थांनी केला आहे. तसेच चालू शैक्षणिक सत्रातसुध्दा मिशन शिखरच्या माध्यमातून माहे सप्टे.2024 पासून विद्यार्थांची प्रवेश पूर्व परिक्षेची तयारी करण्यात येणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार : प्रकल्प कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणुन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी डी.के.टिंगुसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.बोंगीरवार यांनी तर संचालन पी.बी.कुतरमारे यांनी केले. यावेळी वाय.आर चव्हाण, पी.पी.कुळसेगे, एस.डी.श्रीरामे, श्री. दाभाडे व गृहपाल श्री. पोहाणे आदी उपस्थित होते.