प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’
Ø जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे भविष्यातील घराचा अभिनव उपक्रम
चंद्रपूर : प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पर्यावरणमुक्त डेमो हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या सभोवतालच्या प्रदूषणाची चर्चा करतांना प्लास्टीक कचरा व्यवस्थापन ही एक प्रमुख समस्या आहे. विविध संशोधन अभ्यासानुसार, प्लास्टीकचे विघटन हेाण्यासाठी 20 ते 500 वर्षे लागतात व ते दीर्घ काळापर्यंत वातावरणात राहते. ज्यामुळे केवळ मानवांसाठीच नाही तर पर्यावरणालाही धोका आहे. या संपूर्ण बाबीचा विचार करतांना जिल्हा परिषद चंद्रपूर व रॅग आय अपसायकलिंग कंपनी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण डेमो हाऊस बांधकाम अंतर्गत भविष्यातील घर बांधले गेले आहे.
पर्यावरणयुक्त असे डेमो हाऊसची संकल्पना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता वन विभागाकडून बॉटनिकल गार्डन मध्ये 625 चौरस फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व डॉ. बालमुकुंद पालीवाल यांचे रॅग आय अपसायकलिंग कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने डेमो हाऊस तयार करणात आले आहे.
19 फुट उंच व 10 फुट बाजुच्या भिंतीसह 625 चौरस फुट क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले असून, १३ टन सिंगल – युज फेकून दिलेले प्लास्टिक अपसायकल करून सदरचे बांधकाम करण्यात आले आहे. भिंतीपासून छतापर्यंतची संपूर्ण रचना सर्व प्रकारच्या अपसायकल प्लास्टिक सामग्रीचा वापर करून तयार केली आहे. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिक तंतुपासुन बनविलेले उच्च- गुणवत्तेचे इन्सुलेशन साहित्य इष्टतम तापमान नियमन राखते, घरातील वातावरण गरम –थंड करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करते. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिकचा वापर करून, मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून किंवा नैसर्गिक वातावरणास प्रदूषित करण्यापासून प्रतिबंधित करते.
ग्रामीण भागामध्ये बांधकाम करण्यात येणारे घरकुले, वरील नमुद केल्यानुसार सिंगल –युल- प्लास्टिक पासून केल्यास ग्रामीण भागात प्रदुषण होणार नाही व गांव पर्यावरणयुक्त राहण्यास मदत होईल. ग्रामीण भागात गोळा होणारा वेस्ट प्लास्टिक, बचत गटामार्फत संकलित करून संस्थेला आणून दिल्यास, या वेस्ट प्लास्टिक पासून विविध प्रकारच्या वस्तु तयार करून देण्यात येईल, असे डॉ. पालीवाल सांगितले आहे.
यासर्व बाबीचा विचार करतांना आपणास पर्यावरण संतुलन ठेवणे आवश्यक असल्याने, भविष्यात घरे बांधकाम करतांना सिंगल- युज -प्लास्टिक पासून घरे बांधकाम करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.