गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली : देवेंद्र फडणवीस
:- जहाल मोऱ्हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसर्पण
गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोऱ्हक्या समजल्या जाणार्या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. श्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली.
आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा व माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले होते. आमदार देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर याचेवर 25 लाखांचे बक्षीस होते, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. माओवादी गतिविधीचे प्रमुख म्हणून या दोघांकडे पाहिले जायचे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती नक्षली कारवायात सहभागी झाला नाही, हे यश आमच्या पोलिस दलाने मिळविले आहे. सी-60 पथकाने आपला दरारा असा निर्माण केला की, एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा बंदुकीचा सामना करावा लागेल. ते या पथकाचे मोठे यश आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न हाती घेण्यात आला आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. कालही काही प्रकल्पांबाबत मी बैठक घेतली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आदिम जमातींसाठी 24,000 कोटींची योजना, आदिवासी संस्कृतीचे जतन, देशातील प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती अशा अनेक घटना या आदिवासींना बळ देणार्या आहेत. शिस्त आणि संवेदना एकत्र झाल्यानेच गडचिरोली पोलिसांबद्दल आदराची भावना आहे, असेही गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पोलिस भरतीला स्थगिती दिली तर 17,000 पदांची भरती विधानसभांची आचारसंहिता लागणार असल्याने पुढच्या वर्षावर जाईल. त्यानंतर आणखी 9000 पोलिस भरती करायची असल्याने आणखी एक वर्ष लांबणीवर जाईल. त्यामुळे जेथे पाऊस आहे, तेथे दुसरी तारीख देऊन पदभरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आज गडचिरोलीत तर आपण केवळ स्थानिकांचीच भरती करतो आहोत. 1000 पदांसाठी गडचिरोलीतील 28,000 युवकांनी अर्ज भरले आहेत. त्यांचे वयाचे नुकसान होऊ नये, असे सांगून वेळेतच पोलिस भरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. एकीकडे नक्षली दलात एकही व्यक्ती भरती होत नाही व पोलिस दलात भरतीसाठी २८ हजार अर्ज यातून नागरिकांचा संविधानाप्रती व्यक्त विश्वास दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांनी देखील गडचिरोलीची प्रतिमा उंचावण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी माध्यमांना धन्यवाद दिले.
नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल यांनी केंद्र व राज्य शासनाकडून नक्षलविरोधासाठी कायम सहकार्य व मदत मिळत असल्याचे सांगितले तर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून नक्षलविरोधी कार्याची माहिती दिली.