भंडारा जिल्ह्यात सारस गणना व पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित

जिल्ह्यात सारस गणना व पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित

           भंडारा,दि.22 : जिल्ह्यात 23 जून 2024 दिन रविवारी सारस गणना घेण्यात येत आहे. जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सारस संवर्धन समिती कार्य करीत आहे. सारस गणनेच्या आयोजनाची व्यवस्था श्री राहुल गवई, उपवन संरक्षक भंडारा यांच्या आदेशानुसार भंडारा वन विभाग व सेव इकोसिस्टम अँड टायगर (सीट) संस्था द्वारा करण्यात येत आहे.

              जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील एकूण 25 ठिकाणी रविवारी पहाटे पाच वाजता पासून गणना सुरू करण्यात येईल. सदर गणनेत वन कर्मचारी, जिल्हाधिकारी नियुक्त नऊ सारस मित्र सोबत शेतकरी, व सीट संस्थेचे 30 स्वयंसेवक भाग घेणार आहेत. याच दिवशी गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सारसगणना घेण्यात येत आहे, त्याचे आयोजन गोंदिया वन विभाग व सेवा संस्था गोंदिया द्वारा करण्यात आली आहे.

           गणनेच्या पूर्वतयारीसाठी तुमसर व भंडारा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी व शनिवारी कार्यशाळा घेण्यात आली. भंडारा, जाम-कांद्री, तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेजेरी ह्या पाच वनपरिक्षेत्रातील कर्मचारी, सारस मित्र व गणनेत भाग घेणारे स्वयंसेवकांनी कार्यशाळांमध्ये भाग घेतला. सदर कार्यशाळेला श्री शाहिद खान, सदस्य जिल्हा सारस संवर्धन समिती व श्री सावन बाहेकर, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया यांनी सारस गणना करताना घेण्यात येणारी पद्धती व त्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळेला श्री राजकमल जोब, वरिष्ठ पक्षी अभ्यासक, श्री तेजस पारशीवनिकर, अध्यक्ष सीट, श्री रहांगडाले, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर, श्री संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व सेवा संस्थाचे कन्हैया उदापूरे, सीट संस्थेचे अझहर पाशा, नाहीद परवेज, युवराज बघेले उपस्थित होते.