जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे निवासी महिला संस्थांना भेट
चंद्रपूर, दि. 21 : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय तपासणी समितीने सखी वन स्टॉप सेंटर, बंगाली कॅम्प येथील वर्किंग वूमेन हॉस्टेल आणि इंदिरानगर येथील महिला स्वाधारगृहाला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत वरील निवासी महिला संस्था चालविल्या जात असून या कार्यालयाचे यावर पूर्ण नियंत्रण असते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात तपासणी समितीद्वारे संयुक्तरित्या संस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, आरोग्य विषयक काळजी, समुपदेशन सेवा, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आदीबाबत महिलांशी संवाद साधून माहिती घेण्यात आली.
जिल्हास्तरीय तपासणी समितीने संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या महिला निवास सोयी, कायदेविषयक सल्ला व समुपदेशन सेवा विषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहचणे, जनजागृती करणे तसेच काही मदत लागल्यास किंवा अडचण असल्यास जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा, अशा सुचना समितीने दिल्या.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक श्री. चिंतावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, सा.बा. विभागाच्या शाखा अभियंता महिमा डोंगरे, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कांचन वरठी, परिविक्षा अधिकारी आतिशकुमार चव्हाण, महिला स्वाधारगृहाच्या संस्थापिका विजया बांगडे, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले आदी उपस्थित होते.