दैनंदिन योगा हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे

दैनंदिन योगा हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे

जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योग हे प्राचीन शास्त्र असून या शास्त्राने केवळ आपली अमूल्य परंपरा समृद्ध केली नाही तर या शास्त्राच्या साधकांचे जीवन समृद्ध केले आहे. शारीरिक स्तरावर विविध आसने करून योग अभ्यास केला जातो. योग ही जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. योगाची परंपरा जोपासणे हे अत्यंत आवश्यक असून निरोगी व सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे निरोगी शरीर व स्वस्थ मनासाठी योगासने आवश्यक असून दैनंदिन योगा हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध योग संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परीसरात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी अमित पुडें, आर्ट ऑफ लिव्हींगचे योग प्रशिक्षक मिलींद उमरे, अंजली कुळमेथे, पतजंली योग समितीच्या माधुरी दहीकर आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग ही जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. योगाची परंपरा जोपासणे हे अत्यंत आवश्यक आहे. वर्षातून एक दिवस हा योगा दिन साजरा केला जातो. मात्र, आसनाची ओळख वर्षभर असावी, तरच योग दिनाचे सार्थक झाल्यासारखे होईल. रोज सकाळी उठून योगा केल्यास योगाप्रती रुची निर्माण होईल. प्रत्येकानेच स्वतःसाठी वेळ काढून योगासने केली पाहिजे, आजच्या दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी संकल्प करून नियमित योगासने करावीत. असेही कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले.
कार्यक्रमामध्ये, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध योग संस्था तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.