देसाईगंज आय.टी.आय. मध्ये 21 जून ला रोजगार मेळावा
गडचिरोली,दि.19 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर मेळाव्याचे उद्घाटन आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथि म्हणून तहसिलदार प्रीती डुडूलकर, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, भारतीय स्टेट बँक वडसाचे प्रबंधक राजू एम. मुंडे तसेच आफताब आलम खान, प्रा. लालसिंग खालसा, प्रा. दामोधर शिंगाडे प्राचार्य, संजय कुथे, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी बँकेचे अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी आणि पोलिस भरती व अग्निवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे.
सदर संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी घेण्याचे आवाहन योगेंद्र शेंडे सहा. आयुक्त कौशल्य विकास व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार आणि कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी केले आहे.