जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांना लवकरच मिळणार नवीन आधार केंद्र

जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांना लवकरच मिळणार नवीन आधार केंद्र
‘जनसंवादातून सुशासनाकडे’ कार्यक्रमाचा परिणाम
नागरिकांच्या समस्येची तात्काळ दखल
गडचिरोली दि. 19 : शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना आधार कार्ड बनवने सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे प्रत्येक नवीन महसूल मंडळात आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकतेच ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ हा दूरदृष्‍यप्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांशी संवादाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात दिनांक 13 जून रोजी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने ते शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या होत्या. याची तात्काळ दखल घेवून प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आधारकार्ड समस्येबाबत पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत चौकशी केली. आधार कार्डमुळे शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व महसूल मंडळ स्तरावर आधार केंद्र स्थापण करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाकडे नवीन 20 आधार संच मिळण्याची मागणी प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांकडे आधार कार्ड असणे व ते अद्यावत असणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, अतिदुर्गम व भौगोलिक क्षेत्राने मोठा असून उपलब्ध आधार नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने अतिरिक्त 20 आधार नोंदणी संच पुरवठा करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 59 महसूल मंडळ आहेत. यात जुने 40 व 19 नवीन स्थापण झालेले महसूल मंडळ आहेत. या 19 नवीन महसूल मंडळात कुरखेडा तालुक्यातील कढोली, कोरची तालुक्यातील बेडगाव, कोटगूल व बसेली, गडचिरोली तालुक्यात येवली, पोर्ला, पोटेगाव, धानोरा तालुक्यात चातगाव, सुरसुंडी, रांगी, मुलचेरामध्ये लगाम माल, एटापल्लीतील कोटमी, बुर्गी, हालेवारा व तोडसा, भामरागड तालुक्यातील लाहेरी व ताडगाव तसेच सिरोंचा तालुक्यातील बाम्हणी यांचा समावेश आहे. या नवीन महसूल मंडळाचे ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालकातून नवीन आधार केंद्र चालकांची निवड करण्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी भाकरे यांनी संबंधीत तहसिलदार यांना दिल्या आहेत.