प्रकरणे निकाली काढा अन्‍यथा चौकशी लावू आमदार सुधाकर अडबाले

प्रकरणे निकाली काढा अन्‍यथा चौकशी लावू
आमदार सुधाकर अडबाले
: नागपूर विभागाची समस्‍या निवारण सभा

नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांनी समस्‍या निवारण सभेत तीव्र रोष व्‍यक्‍त केला. शिक्षकांची समस्‍या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्‍यक्‍त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांनी प्रलंबित असलेल्‍या समस्‍या तात्‍काळ निकाली न काढल्‍यास सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) कार्यालयाची चौकशी करा, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना बैठकीत दिले.

‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (ता. १४) रोजी नागपूर विभागातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्‍या निवारणार्थ समस्‍या निवारण सभा शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यासोबत धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडली. या सभेस विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), वेतन पथक अधिक्षक (प्राथ./माध्य.), लेखाधिकारी (शिक्षण) व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्‍थित होते. विशेष म्‍हणजे ही समस्‍या निवारण सभा साडेसहा तास चालली.

सभेच्या सुरुवातीलाच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी लोकप्रतिनिधींच्या सभेला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘क्‍लास’ घेतला. भंडारा येथील वेतन पथक कार्यालयातील अनियमिततेबाबत चर्चा करण्यात आली. अधीक्षक यांनी केलेल्‍या अनियमिततेची झालेल्‍या चौकशीत दोषी आढळलेल्‍या अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आमदार अडबाले यांनी दिले. संचालक (प्राथ./माध्य.) पूणे यांचे १ जुलै पासून शाळा सुरु करण्याबाबतचे पत्र असताना चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचे पत्र काढले. सदर पत्र रद्द करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिल्‍या.
नगरपरिषद शालेय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी पावत्‍या मिळत नसल्‍याने समस्‍या निवारण सभेचा संदर्भ देऊन शासनास पत्र देण्यात यावे. एनपीएस व जीपीएफ खाते नसलेल्‍या शालेय कर्मचाऱ्यांना सहाव्‍या व सातव्‍या वेतन आयोगाचे थकीत हप्‍ते रोखीने देण्यात यावे, याबाबत चर्चा करण्यात आली. सदर कर्मचाऱ्यांबाबत विभागातील शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांची बैठक घेऊन खाते काढण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण उपसंचालक यांना आमदार अडबाले यांनी दिले.

सन २०२१-२२ व २०२२-२३ च्‍या जीपीएफ व एनपीएस पावत्‍याबाबत जिल्‍हानिहाय आढावा घेण्यात आला. ऑनलाईन पावत्‍या दरमहा मिळत नसल्‍याने शिक्षकांत नाराजी आहे. गडचिरोली जिल्ह्यात ऑफलाईन पावत्‍या मिळत आहे. तेव्‍हा विभागातील सर्व पे-युनिट अधीक्षकांनी पुढील सहा महिन्‍यांत ऑफलाईन पावत्‍या देण्याबाबत कार्यवाही करावी, असे सूचना आमदार अडबाले यांनी दिल्‍या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्‍या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी कार्यवाही करावी. अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करण्याबाबत सर्व जिल्ह्याने कार्यवाही करण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी पत्र निर्गमित करावे. श्रीमती कल्‍पना चव्हाण (तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर) यांच्या अनियमिततेबाबत झालेल्‍या चौकशीवर पुढील कार्यवाही करावी. चिमूर एज्‍यु. सोसा. चिमूर अंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदोन्नतीबाबत सेवाज्‍येष्ठ शिक्षकांची बैठक घेऊन तात्‍काळ पदोन्नती देण्यात याव्या यासह अन्‍य विषयांवर सविस्‍तर चर्चा करून समस्‍या निकाली काढण्याच्या सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), वेतन पथक अधिक्षक (प्राथ./माध्य.), लेखाधिकारी (शिक्षण) यांना दिल्‍या. शिक्षकांच्या समस्‍यांवर जे अधिकारी हयगय करतील तसेच सेवा हमी कायद्याचे उल्‍लंघन करील असतील, त्‍यांच्या कार्यालयाची तात्‍काळ चौकशी करा, अश्‍या सूचनाही त्‍यांनी दिल्‍या.

यानंतर नागपूर विभागाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍यांवर बैठक पार पडली. या सभेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्‍या सामूहिक व वैयक्‍तिक समस्‍यांसह चर्चा करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्‍या तात्‍काळ सोडवा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना दिले.

यावेळी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, शिक्षण उपसंचालक उल्‍हास नरड, रवींद्र पाटील, श्री. बोदाडकर, शेखर पाटील, विज्‍युक्टा महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जगदीश जुनगरी, प्रा. भाऊराव गोरे, डॉ. गजानन धांडे, डॉ. अभिजित पोटके, विमाशि संघाचे नागपूर शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, जिल्‍हा अध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, वर्धा जिल्‍हा अध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार, चंद्रपूर जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, भंडारा जिल्‍हा अध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्‍हा कार्यवाह राजेश धुर्वे, गडचिरोली जिल्‍हा अध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्‍हा कार्यवाह अजय लोंढे, गोंदिया जिल्‍हा अध्यक्ष ओमप्रकाश गुप्‍ता व मोठ्या संख्येने नागपूर विभागातील वि.मा.शि. संघ, विज्‍युक्टाचे पदाधिकारी, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्थित होते.