दिव्यांग तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
Ø 31 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 11 : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्हास्तरीय 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगांकरिता सन 2024-25 या वित्तीय वर्षात दिव्यांगांसाठी लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील पात्र व गरजू दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेकरीता 31 जुलै 2024 पर्यंत पंचायत समितींमध्ये अर्ज सादर करावे. सदर योजना पुढीलप्रमाणे आहे.
दिव्यांगाना साहित्य पुरविणे उदा. तिन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र इ. (वैयक्तीक), दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पीठ गिरणी, शिलाई मशिन, झेरॉक्स मशिन, संगणक व प्रिंटर ), दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, (शेळीपालन, कुकूटपाजन, दुग्धव्यवसाय), दिव्यांग शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दाखल्याची अट न लावता अर्थसहाय्य देणे (शेती विषयक अवजारे, मोटार पंप, ठिबक सिंचन, बि-बियाणे), स्वयंरोगगारार्थ दिव्यांगाना ई-रिक्क्षा/ ट्रॉली पुरविणे. दिव्यांग जोडप्यांचा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदान देणे.
त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, जि.प. चंद्रपूर च्या 20 टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 75 टक्के व 90 टक्के अनुदानावर योजना राबविण्यात येत आहे. यात मागासवर्गीय अल्पभुधारक शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविणे, मागासवर्गीय अल्पभुधारक शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर सबमर्शिबल विद्युतपंप पुरवठा करणे, ग्रामीण भागातील मागासवर्गीय अल्पभुधारक शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर ऑईल इंजिन पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन / पिकोफॉल मशिन पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 90 टक्के अनुदानावर आटा चक्की पुरविणे, मागासवर्गीयांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य ई-रिक्षा, झेरॉक्स मशिन इ. 75 टक्के अनुदानावर पुरविणे.
उपरोक्त योजनांचे लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व गरजू लाभार्थ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत पंचायत समितींना अर्ज सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.