प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे 15 जुलै पर्यत फक्त 1 रूपया भरून विमा पोर्टल वर नोंदणी करा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

15 जुलै पर्यत फक्त 1 रूपया भरून विमा पोर्टल वर नोंदणी करा

 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 राबविण्यासाठी शासनाकडुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्हयाकरिता या योजने अंतर्गत धान व सोयाबिन ही दोन अधिसुचित पिके आहेत. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राहय धरण्यात येईल. यावर्षी पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रूपया भरून पिक विमा पोर्टल वर नोंदणी करावयाची आहे.

योजनेत समाविष्ट जोखीमेच्या बाबी:- खालील प्रकारचे पिक नुकसान झाल्यास विमाधारक विम्यासाठी पात्र ठरेल. हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यास (अधिसूचित क्षेत्रातील 75% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न झाल्यास पुर, पावसातील खंड, दुष्काळ ई. बाबींमुळे अधिसूचित क्षेत्राच्या अपेक्षित उत्पादनात मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा जास्त घट येत असल्यास.

 दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भुस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे हंगामाच्या शेवटी पिकांच्या उत्पादनात येणारी घट.

 गारपीट, भुस्खलन, विमा क्षेत्र जलमय होणे, ढग फुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे झालेल्या नुकसानीसाठी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल.

पिकांच्या काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेढया बांधून सुकवणीस ठेवलेले अधिसूचित पिक जर गारपिट, चक्रीवादळ, चक्रिवादळामुळे आलेला पाऊस बिगर मोसमी पाऊस यामुळे बाधीत झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल. सदर योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्र.202306271317241001

सदर योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांसाठी एैच्छिक आहे. सदर योजनेत बँक/ कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ प्रादेशिक ग्रामीण बँक/ आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांचे मार्फत विमा हप्ता भरावयाचा आहे. अर्जाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप) सन 2024-25 अंतर्गत सर्व समावेशक पिक विमा योजनेमध्ये धान व सोयाबिन हि दोन पिके जिल्हयमध्ये अधिसूचित आहे. अधिसूचित क्षेत्र हे महसूल मंडळ निश्चित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हयाकरीता चोलामंडलम एम.एस जनरल इन्सुरंस क. लि. ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहे.

तरी, प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप) सन 2024-25 योजने मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे श्रीमती संगिता माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी आवाहन केले आहे.