सर्व जीर्ण इमारतींना नोटीस
चंद्रपूर ११ जुन – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील दोन दिवसात दोन जीर्ण इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. त्यानुसार झोन क्र.२ अंतर्गत भिवापूर प्रभाग पठाणपूरा गेट जवळ मिलिंद नगर येथील चिवंडे यांची जीर्ण इमारत तसेच एकोरी प्रभाग मानवटकर हॉस्पीटल जवळील खोब्रागडे यांची जीर्ण इमारत अश्या दोन इमारती दोन दिवसात निष्कासीत करण्यात आल्या आहेत. उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.