जलयुक्त शिवारच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

जलयुक्त शिवारच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 7 : जलयुक्त शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.7) जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या. वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसरंक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), विशालकुमार मेश्राम (मूल), जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंता प्रियंका रायपूरे व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलयुक्त शिवारच्या ज्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, अशी प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावे. तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाली असल्यास निविदा प्रक्रिया राबवून काम लवकर सुरू होईल, याबाबत नियोजन करा. संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करावी. या योजनेचा शासन स्तरावरून नियमित आढावा होत असल्याने जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती द्यावी. उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी तालुका कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणांना घेऊन तालुकास्तरावर त्वरीत बैठक घ्यावी. निधी मागणीचे प्रस्ताव असतील तर ते तातडीने प्रशासनाकडे सादर करावे. जेणेकरून निधी उपलब्ध करून देऊन कामांना गती देण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

बैठकीला दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.