रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा
चंद्रपूर, दि. 27 : रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. बोबडे उपस्थित होते.
शहरातील वरोरा नाका येथे चारही बाजूंनी येणा-या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गतीरोधक लावून त्याला वारंवार पेंटींग करणे. तसेच सोलर ब्लिंकर आणि प्लॅस्टिकचे डेलीनेटर्स लावणे. शहरातून जाणा-या मार्गावर वेग नियंत्रण, गतीरोधक, चालकांसाठी सूचना आदी बाबींचे माहितीचे फलक स्पष्टपणे निदर्शनास येईल, अशा जागांवर लावावे. शहरातील अनेक चौकात हिरवा सिग्नल संपण्यापूर्वीच दुस-या बाजूचे वाहनचालक गाड्या चालवितांना दिसतात. हे अतिशय धोकादायक असून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूक नियंत्रण व अपघात कमी करण्याबाबत नागरिकांच्या काही सुचना असल्यास त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.