अनधिकृत होर्डींग्ज त्वरीत काढण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना

जिल्ह्यातील 39 अनधिकृत होर्डींग्ज निष्कासीत

Ø अनधिकृत होर्डींग्ज त्वरीत काढण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना

चंद्रपूर : मुंबई येथील होर्डींग्ज दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून आतापर्यंत अनधिकृत असलेले 39 होर्डींग्ज निष्कासीत करण्यात आले आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 26 होर्डींग्जचा समावेश आहे.

मुंबई येथे होर्डींग्ज दुर्घटना घडताच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तातडीने मनपा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, जिल्हा परिषद, रेल्वे विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व इतर संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 39 अनधिकृत होर्डींग्ज काढण्यात आले असून उर्वरीत होर्डींग्जवर कारवाई सुरू आहे. यात सर्वाधिक 26 अनधिकृत होर्डींग्ज चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील असून नगर पालिका प्रशासन विभागामार्फत वरोरा येथील 1, गडचांदूर येथील 2, राजुरा येथील 2, ब्रम्हपूरी येथील 2, नागभीड 3 आणि चिमूर येथील 3 होर्डींग्ज निष्कासीत करण्यात आले आहे.

आपापल्या क्षेत्रात जे अनधिकृत होर्डींग्ज आहेत, ते तातडीने काढावे तसेच ज्या होर्डींग्जना परवानगी आहे, ते सर्व नियमानुसार व नियमित आकारात आहे की नाही, तेसुध्दा तपासावे, अशा सुचना जिल्हा‍धिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील अधिकृत जाहिरात फलकांची संख्या : रेल्वे विभाग 35, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 124, नगर पालिका प्रशासन क्षेत्र 83, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय 49 आणि ग्रामपंचायत क्षेत्र 19 असे एकूण 310 अधिकृत होर्डींग्ज आहेत.