शैक्षणिक कामाकरीता लागणारे दाखले वेळेपूर्वी काढून घ्या Ø जिल्हाधिका-यांचे पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक कामाकरीता लागणारे दाखले वेळेपूर्वी काढून घ्या

Ø जिल्हाधिका-यांचे पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन

चंद्रपूर, दि. 14 : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल नुकताच लागला आहे. जून महिन्यात स्टेट बोर्डाचा निकाल लागणार असून पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कामाकरीता लागणारे आवश्यक दाखले वेळेपूर्वीच काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, भूमीहिन प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. दाखले वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नाहक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच पालकांना वेळेवर धावपळ करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदरच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे / दाखले आताच काढून घ्यावे व ऐनवेळेवर होणारा त्रास टाळावा.

परिक्षांचे निकाल लागल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ तसेच तहसील कार्यालयात एकच गर्दी होते. त्यामुळे वेळेत दाखले मिळण्यास विलंब होऊ शकतो. कधीकधी तांत्रिक अडचणीसुध्दा उद्भवू शकतात. हा विलंब व त्रास टाळण्यासाठी वेळेपूर्वीच उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, भूमीहिन प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवा केंद्र, तालुका स्तरावरील सेतू केंद्रातून दाखल्यांसाठी अर्ज करावा व रितसर दाखल्यांची पोचपावती घ्यावी. शैक्षणिक कामाकरीता आवश्यक असणारे सर्व दाखले पालकांनी वेळेपूर्वीच प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.