१२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी करण्यात आले नष्ट

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलीस दलाकडून नष्ट करण्यात आले

१२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी करण्यात आले नष्ट

गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने अश्याच प्रकारच्या माओवादयांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे.

उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोस्टे गॅरापत्ती हद्दीमध्ये असलेल्या टिपागड पहाडी जंगल परिसरामध्ये माओवाद्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स तसेच पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे. अशी गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी त्या भागात शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलाचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स/स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. करिता खात्रीशीर मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर टिपागड पहाडी जंगल परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकिस आल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी तातडीने ०२ बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी ६० चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले. आज दिनांक ०६/०५/२०२४ रोजी सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ०६ प्रेशर कुकर व स्फोटकांनी आणि गंजलेल्या लोखंडी तुकड्यांनी भरलेले ०३ क्लेमोर पाईप्स देखील सापडले. उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट देखिल सापडले. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. यासोबतच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जाळून नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी, श्री. एम. रमेश सा., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस पथक व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.