लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
आज रवाना होणार मतदान पथके
हिट वेव्हच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध
भंडारा, दि. 17 – भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणीक चव्हाण,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यावेळी उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात यापूर्वी चांगल्या मतदानाची परंपरा असून यावेळी देखील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे श्री .कुंभेजकर यांनी सांगितले.
मतदान शपथ, फ्लॅश ऑफ तसेच अनेक मतदार जागृतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. अशा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मतदार संघात 2133 मतदान केंद्र असून 18 लाख 27 हजार हि मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये नऊ लक्ष 97 हजार भंडारा जिल्ह्यातील तर आठ लक्ष 30 हजार गोंदिया जिल्ह्यातील मतदारांची संख्या आहे. गृह मतदान प्रक्रियेत 1301 नागरिकांनी अर्ज दिले होते त्यापैकी 1283 मतदारांनी सहभाग घेतला.
मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना होण्यासाठी भंडार्यात 140 बसेस तर गोंदियातही तेवढ्याच बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान पथकांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
हिटवेव्ह बाबत आयोगाने दिलेले निर्देश लक्षात घेता आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रथमोपचार पेटी मतदान पथकांसोबत देण्यात आली आहे .तर मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी,वेटीग शेड,वैदयकीय किट सुविधा उपलब्ध करून दिल्यात.
आतापर्यत जिल्हयात तीन कोटी 59 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे, तर पोलीस विभागाने 271 शस्त्रास्त्र जमा केली आहेत.
भंडारा गोंदीया मतदारसंघात 2133 मतदान केंद्र असून यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.
यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके उद्या, दि. 18 एप्रिल रोजी मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.
41 महिला मतदान केंद्रे
दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 41 महिला मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.
*सी व्हिजिल ॲपवर 18 तक्रारी*
सी व्हिजिल या ॲपवर 18 तक्रारींची नोंद करण्यात आली. यात एका तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 17 तक्रारींचे निरसन करण्यात आले.
निवडणुक पार्श्वभुमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोरडा दिवस जाहीर झाला आहे.तसेच मतदानासाठी सुटी देखील जाहिर करण्यात आली आहे.
राजकीय जाहिरातीचे माध्यम व संनियंत्रण समितीकडून 5 उमेदवारांनी प्रमाणीकरण केले असुन त्यामध्ये व्हिडीयो तसेच ग्राफीक व तसेच प्रिंट मीडीया जाहिराती प्रमाणीत केले आहे.