निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे
नोडल अधिकाऱ्यांचा आढावा
गडचिरोली दि. 16 : 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी आपसी समन्वयाने काम करून ही लोकसभा निवडणूक शांततेत व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी आज दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा श्रीमती माधवी खोडे यांनी आज घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. निलोत्पल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, आणि गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे मतदानपूर्व 72 तास, 48 तास व 24 तासात करावयाच्या कार्यवाहीबाबत श्रीमती खोडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निवडणूक प्रचार संपल्यावर राजकीय प्रचाराचे बॅनर काढणे, वाहनाची परवानगी व इतर आवश्यक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले. महिला, दिव्यांग व युवा मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात कसूर करू नये. मतदान अधिकाऱ्यांजवळ पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, तसेच त्याचा वापर कसा करावा याबाबतही त्यांना सूचना द्याव्यात. मतदान अधिकारी व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज भत्ता वेळेवेर मिळावा. मतदान कालावधीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्या याबाबत दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला संबंधीत नोडल अधिकारी उपस्थित होते.