लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरोग्य विभाग सज्ज
दि.16 लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 19 एप्रिल 2024 च्या अनुषंगाने एकुण 948 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत प्रत्येक मतदान केंद्रावर 2 सदस्यीय आरोग्य चमु गठीत करण्यात आलेली असुन त्यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात येणारआहे. सोबतच प्रा.आ. पथके, उपकेंद्रे, व प्रा.आ.केंद्रावर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या असुन या सर्व संस्थांमध्ये अत्यावश्यक औषधोपचार किट उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
त्याच प्रमाणे उष्माघाताचा धोका लक्षात घेता सर्व मतदान केंद्रावर क्षारसंजीवनी (ORS) चे द्रावण उपलब्ध असणार आहे. एकुण 948 मतदान केंद्रावर 1896 आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, सोबतच 190 आरोग्य पर्यवेक्षक (आ.सहा./सामुदाय आरोग्य अधिकारी/मानसेवी वैद्यकिय अधिकारी ) तसेच वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची शिघ्र प्रतिसाद पथके ( Rapid Response Team ) गठीत करण्यात आलेली आहेत. याबाबत जिल्हास्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकिय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बैठका आयोजीत करुन वेळोवेळी आढावा घेण्यात आलेला आहे.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये सुसज्ज स्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यात एकुण 121 रुग्णवाहिका रुग्णसंदर्भ सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सर्व तालुका स्तरावर तालुकास्तरीय नियंत्रण पथक असे 12 तसेच जिल्हा स्तरावर नियंत्रण पथक एक असे एकुण 13 नियंत्रण पथक गठीत करण्यात आलेले आहेत. जिल्हा नियंत्रण पथकाचा दुरध्वनी क्रमांक- 07132-222030 हा आहे. त्यांच्या मार्फत मतदानाच्या अनुषंगाने जिल्हयातील आरोग्य विषयक समस्याबाबत निगराणी ठेवण्यात येणार आहे. सदर नियंत्रण पथक दिनांक 18 एप्रिल 2024 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत कार्यान्वीत असणार आहे. सोबतच जिल्हास्तरीय अधिका-यांना सुध्दा एका तालुक्याची जबाबदारी पर्यवेक्षणाकरीता देण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे आरोग्य विभागाच्या पुर्वतयारीचा आढावा घेत आहेत. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.