चिचडोह बरेज प्रकल्पाचे दरवाजे खुले,वैनगंगा तिरावरील गावांना दिलासा
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश
शेतकरी आणि गावक-यांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर, 11 एप्रिल -चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे गुरुवारी सुरू करण्यात आल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना त्यांनी त्यासंदर्भात 15 मार्च 2024 रोजी पत्र पाठवून सदर प्रकल्पाचे दरवाजे खुले करण्याची विनंती केली होती.
चंद्रपूर जिल्हयातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगांव, देवाडा, पिपरी देशपांडे, चकठाणा, चक ठाणेवासना, गंगापूर टोक, घाटकुळ, देवाडा यासह पोंभुर्णा शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. शिवाय, मका, दुबार धानपिक आणि भाजीपाला आदी पिके धोक्यात आली होती. या भागात, पूर्वी चिचडोह बरेज प्रकल्पाद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. परंतु, पाण्याअभावी सदर प्रकल्पाचे गेट बंद करण्यात आले होते. आता हे दरवाजे ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे उघडण्यात आले असून उपरोक्त गावांची पाणी टंचाईचा समस्या संपुष्टात आली असून शेतकरी आणि गावक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.