निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक
चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे पसरले असल्यामुळे येथे कामगारांची संख्या खुप मोठी आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून औद्योगिक आस्थापनांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
औद्योगिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर एक स्वीप नोडल अधिका-याची नेमणूक करावी. तसेच 13 – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत गत निवडणूकीमध्ये ज्या मतदान केंद्रावर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, अशा मतदान केंद्र परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या थीम ठेवून त्यावर आधारीत मतदान केंद्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सुचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी औद्योगिक संस्थेस मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले.
मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागते. हे लक्षात घेता, या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.
ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे.