चंद्रपूर १० एप्रिल – चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन १ जानेवारी पासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्याचा इशारा मनपातर्फे देण्यात येत आहे.
सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,मात्र मीटर बंद झाले असता कळुन येत असल्याने अश्या नागरिकांना सूचना देण्यात येत असुन पुन्हा गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अथवा त्यांची नळ जोडणी बंद करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील पाणीटंचाई तसेच कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळाला विद्युत पंप अथवा टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.उन्हाळा सुरु असल्याने पाण्याचा योग्य व पुरेसा वापर करण्याचे तसेच पाणी पुरवठाबाबत काही तक्रार असल्यास ९११२२१६०९५ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.