निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय चांगले काम करा
Ø जिल्हाधिका-यांकडून विविध यंत्रणेच्या तयारीचा आढावा
चंद्रपूर, दि. 5 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. आता आपल्याकडे केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सर्व यंत्रणेकडून समाधानकारक काम झाले असले तरी यापुढे आणखी चांगले काम करा, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या
नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांच्या तयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी (केळापूर, जि. यवतमाळ) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल तसेच सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र, त्याची छाननी, अंतिम उमेदवार यादी, चिन्हांचे वाटप हे टप्पे प्रशासनाकडून अतिशय चांगल्या पध्दतीने पार पडले. निवडणूक प्रक्रियेचा अर्धा कालावधी संपला असून आता प्रत्यक्ष मतदानापर्यंत आपल्याकडे तयारीसाठी केवळ दोन आठवडे शिल्लक आहेत. याकाळात निवडणुकीच्यादृष्टीने प्रत्येकाला नेमून देण्यात आलेले काम अतिशय चांगले करा. यात कोणतीही चूक होऊ देऊ नका.
जिल्ह्यासाठी पोस्टल बॅलेट, गृहमतदानाकरीता लागणारे साहित्य व निवडणुकीच्या दृष्टीने इतर आवश्यक बाबी प्रत्येक विधानसभा मतदासंघात उपलब्ध झाले असून अधिकारी आणि कर्मचा-यांचे मनुष्यबळसुध्दा रँडमायझेशन प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आले आहे. आता संबंधितांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणे, ईव्हीएम स्ट्राँग रुमची सुरक्षा व्यवस्था, त्याचा सुरक्षा आराखडा आदी बाबी काळजीपूर्वक तपासून घ्यावा. तसेच मतदान झाल्यानंतर जिल्हास्तरावर एकत्रित गोळा होणा-या ईव्हीएम- व्हीव्हीपॅटसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुमला प्रत्येक सहायक निवडणूक अधिका-यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. आपापल्या मतदारसंघातून स्ट्राँग रुमपर्यंत पोहचण्याचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, गाड्यांची उपलब्धता, पोलिस बंदोबस्त आदी बाबींचे आताच नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी इलेक्टोल रोल, पोस्टल बॅलेट, रँडमायझेशन प्रक्रिया, ईव्हीएम स्ट्राँग रुम व्यवस्था, मतदार माहिती चिठ्ठी वाटपाचे नियोजन, नियंत्रण कक्ष उभारणी, मतदान केंद्रावरील सुविधा, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, खर्च आढावा, एफएसटी, व्हीव्हीटी, व्हीएसटी या टीमकडून करण्यात येणारी कारवाई आदींचा आढावा घेतला.