विमाशि संघाचा विदर्भातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा

विमाशि संघाचा विदर्भातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा

सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांची घोषणा

हुकुमशाही सरकारचा बीमोड करण्यासाठी, देशाचे संविधान टिकवण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, शिक्षण – शिक्षकांच्या हितासाठी विदर्भातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सक्रीय पाठिंबा देत असल्‍याची घोषणा सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

देशात लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. विदर्भात १९ व २६ एप्रिल रोजी मतदान हाेणार आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, शिक्षण क्षेत्रातील वाढत्‍या समस्‍या, १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्‍या देशातील शिक्षक – कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करण्याकडे होत असलेले शासनाचे दुर्लक्ष यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने ‘लोकसभा निवडणूक २०२४’ मध्ये विदर्भातील महाविकास आघाडीच्या (इंडिया आघाडी) सर्व उमेदवारांना सक्रीय पाठिंबा देत असल्‍याचे पत्र राज्‍याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले.

विमाशि संघाच्‍या प्रांतीय पदाधिकाऱ्यांसह झालेल्‍या चर्चेनुसार विदर्भातील बलाढ्य शिक्षक संघटना अशा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ होऊ घातलेल्‍या लोकसभा निवडणूक २०२४ च्‍या निवडणूकीत विदर्भातील सर्व मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विमाशि संघाचे प्रांतीय, जिल्‍हा पदाधिकारी, सदस्‍य सक्रिय प्रचार-प्रसार करतील, अशी मााहिती विमाशि संघाचे प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख, सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहागंडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार यांनी दिली.