निवडणूक निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा
भंडारा, दि. 29 : 11 भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक विनय सिंग व कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांनी आज निवडणूक यंत्रणेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी निवडणूक यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा, घेतलेल्या प्रशिक्षणाचा, उपलब्ध मनुष्यबळाचा तसेच पोलीस अधीक्षक गृहीत मतांनी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पोलीस दलाच्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन आणि अंतर सीमा तपासणीसाठी घटित पथकांची माहिती यावेळी सादर केली.
यावेळी बोलताना विनय सिंग यांनी भंडारा जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाज व पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच निवडणुकीसाठी प्रभावी पद्धतीने प्रतिसाद प्रणाली भंडारा जिल्ह्याने तयार केली असल्याचे मत नोंदवले.
मतदान प्रक्रियेमध्ये 85 पेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग आणि घरी जाऊन मतदान करण्याच्या व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली.
घरी जाऊन मतदान घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व गुप्ततेने मतदान प्रक्रिया पार पाडावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह यांनी निवडणूक कामांमध्ये कार्यरत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोखपणे आपले कर्तव्य बजवावे . निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी ,असे आवाहन यावेळी केले.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी सोबत निरीक्षकांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधींचे मतदान प्रक्रियेबाबत किंवा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे मत देखील निरीक्षकांनी जाणून घेतले.
तत्पूर्वी दोन्ही निरीक्षकांनी नियंत्रण कक्षांना भेट देऊन विविध पक्षांचे कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.