निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा
चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता हेमंत हिंगोनिया यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. हिंगोनिया यांनी कोषागार कार्यालय येथील स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय येथे त्यांनी खर्च विषयाशी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी सर्व नोडल अधिकारी व खर्च व्यवस्थापनासंदर्भात उपस्थित इतर अधिकारी व कर्मचा-यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना दिले.
बैठकीला जिल्हास्तरीय खर्च व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील, यांच्यासह सर्व विधानसभा क्षेत्राचे सहायक खर्च निरीक्षक, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक, सी-व्हीजील चे प्रतिनिधी, हेल्पलाईन सेंटरचे प्रतिनिधी व जिल्हा निवडणूक खर्चासंबंधी संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी राहणार उपलब्ध : निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया (मो. 9404921146) हे खर्चाविषयक नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी ‘बकूल’ व्हीव्हीआयपी कक्ष, कौस्तुभ बिल्डींग, वन अकादमी येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.