आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी विविध बाबींवर निर्बंध
Ø जिल्हाधिका-यांनी केले कलम 144 लागू
चंद्रपूर दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच तसेच आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) कलम 144 मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार
शासकीय कार्यालये / विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे / सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रपीकरण करण्यास निर्बंध करण्यात आले आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, तसेच निश्चित केलेल्या कागदाच्या आकाराप्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहेत.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तिंची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर तसेच सार्वजनिक रहदारी / वर्दळीच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध राहतील. धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक वा भाषिक गटातील मतभेद अधिक तीव्र होतील किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास निर्बंध आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक जागेवर / खाजगी व्यक्तिच्या जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार / रॅली / रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात सलग 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या / वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.
सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्या स्वाक्षरीने आणि कोर्टाच्या शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे.