वन शेताशी निगडीत वृक्ष उत्पादकांचा मेळावा
चंद्रपूर, दि. 14 : वन शेतीशी निगडीत असलेल्या शेतक-यांसाठी वन अकादमी, चंद्रपूर येथे वृक्ष उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी तसेच पेपर, यांत्रिकी व बांबू निगडीत बल्लारपूर पेपर मील, शिरपूर पेपर मील, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वनशेतीशी निगडीत रोपवाटिका यांचा समावेश होता.
यावेळी पुणे येथील सामाजिक वनीकरण विभागाचे अपर मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, नागपूर येथील सामाजिक वनीकरण संरक्षक किशोर मानकर, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, नागपूर वनवृत्तातील सर्व विभागीय वन अधिकारी उपस्थित होते.
उद्योगांनी वनशेती व त्यातील आर्थिक ताळमेळ याबाबत माहिती दिली. तसेच वनशेती कशी फायदेशीर आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर बल्लारपूरच्या नर्सरीला भेट देऊन शेतक-यांना निलगीरी रोपे व त्याच्या संवर्धनाची माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय वन अधिकारी बी.सी.येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. इंगळे, श्री. राजुरकर आदी उपस्थित होते.