12 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत चंद्रपूर – बल्लारपूर रस्त्यावरील जड वाहतुकीस प्रतिबंध
Ø विसापूर येथे बॉटनिकल गार्डनचा लोकार्पण सोहळा
Ø पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 11 : बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथे 11 मार्च 2024 रोजी बॉटनिकल गार्डनचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यक्रमात बदल होऊन आता 12 मार्च 2024 रोजी विसापूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण व विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन होणार आहे.
त्यामुळे या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहे. सोबतच या कार्यक्रमाकरीता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर ते बॉटनिकल गार्डन, विसापूर या मार्गावरून मंत्री महोदयांचे आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सदर मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले असून 12 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत बामणी फाटा, बल्लारपूर ते बंगाली कॅम्प, चंद्रपूर या मार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत अवजड वाहतूकदारांनी खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
- वरोरा, भद्रावती व चंद्रपूरकडून राजुरा किंवा गडचांदूरकडे जाण्यासाठी पडोली – धानोरा फाटा भोयगाव रस्त्याचा वापर करावा.
- गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती, चंद्रपूरकडे येण्यासाठी भोयगाव – धानोरा फाटा – पडोली या मार्गाचा वापर करावा.
- गोंडपिपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मूलकडे जाण्यासाठी येनबोडी – पोंभुर्णा तर चंद्रपूर व मूल कडून बल्लारशहा, गोंडपिपरी, राजुराकडे जाण्याकरीता पोंभुर्णा – येनबोडी या मार्गाचा वापर करावा.
वरील आदेशाचे पालन करून जड वाहतुकदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.