जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा इस्रो, बंगळुरू, म्हैसूरला शैक्षणिक अभ्यास दौरा
भंडारा, दि.28: विद्यार्थी हा स्वतः शिकत असतो. त्यांची कल्पना शक्ती ही अकल्पनीय असते. त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य दिशेने प्रवाहित करण्याकरिता, त्यांना संधी प्राप्त करून द्यायची असते. अशाच संधी मधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, कल्पनाशक्तीला चालना मिळावी व नवनवीन विषयात ज्ञानार्जन प्राप्त व्हावे या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक शाळांतील २० विद्यार्थी व माध्यमिक शाळांतील २५ विद्यार्थी असे एकूण ४५ विद्यार्थी व ५ शिक्षक व कर्मचारी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात बंगळुरू (ISRO) व म्हैसूर (कर्नाटक) येथे भेटी देण्यासाठी रवाना झाले आहेत.
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान सन :२०२३-२४ Exposure Visit outside State या उपक्रमांतर्गत २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी जिल्हा परिषद, भंडारा येथून सकाळी ०७-३० वाजता रविंद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निरोप दिला. याप्रसंगी समग्र शिक्षाचे जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विरेंद्र गौतम, मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती होती.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपाध्यक्ष संदीप ताले, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.