महासंस्कृती महोत्सवात रंगली हास्यजत्रा !
गडचिरोली दि. 19 : महासंस्कृती महोत्सवात आज हास्यजत्राच्या चमूने धमाल विनोद रंगवित सर्वांना पोट धरून हसायला लावले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मतदार जनगृतीवरील पथनाट्य व हास्यजत्रा कार्यक्रम सादर करण्यात आला.
आमदार देवराव होळी, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, अतिरिक्त शल्य चिकित्सक सतीश साळुंखे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, तसेच नितीन पाटील, संगीता धाकाते, ज्योती तायडे आदी याप्रसंगी उपस्थीत होते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या चमूचे प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अरुण कदम,प्रभाकर मोरे, ओमकार राऊत, श्याम सुन्दर राजपूत, शिवाली परब, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी सादर केलेले विनोदी किस्से, नात्यावर आधारित गमंतीजमतीने कार्यक्रमात रंगत आली.
तत्पुर्वी फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर पथनाट्य सादर केले. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनेमतदानाचे महत्व सादर करून. त्यानंतर निवडणूकीत लोकशाही परंपरेचे जतन करून शांततापुर्ण मार्गाने व निवडणूकीचे पावित्र्य राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
सुरूवातीला आमदार देवराव होळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उद्या कार्यक्रमाच्या समारोपीय दिवशी कुवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.