रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया !
Ø सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी
Ø ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत
Ø माँ जिजाऊ आणि छत्रपतींची वेशभुषा असलेली बालके ठरली विशेष आकर्षण
चंद्रपूर, दि.20 : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या सर्वांसाठी छत्रपती हे ऊर्जा केंद्र आहे. लढण्याची शक्ती देण्याचे नाव म्हणजे शिवाजी महाराज होय. त्यामुळे छत्रपतींच्या विचारांचे स्मरण करून रयतेचे राज्य निर्माण करण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गिरनार चौक येथे जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी रंजित यादव, तहसीलदार विजय पवार, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करण्याचा आजचा दिवस आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, तत्कालीन परिस्थितीत जनतेवर अत्याचार वाढत होते, त्यावेळी माँ जिजाऊच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक सूर्य जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:साठी नाही तर समाजासाठी जगले. त्यांनी राजमहल बांधला नाही, तर अभेद्य गडकिल्ले बांधले.
मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘जय भवानी, जय शिवाजी’ जल्लोषाने संपूर्ण शरीरात चैतन्य निर्माण होते. संपूर्ण राज्यात शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यासाठी शासन निर्णय काढला. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींचा विचार केला. न्यायासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे राजे होते. शिवजयंती केवळ एक दिवस नाही तर या दिवशी उर्जा घ्यायची आणि उर्वरीत 364 दिवस रयतेचे राज्य आणण्याचा संकल्प करायचा. आपण कोणत्याही जातीचे, वंशाचे, धर्माचे असू, मात्र हृदयात केवळ शिवबा असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिव ध्वजारोहन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी 26 दिवसांचा प्रवास करून 15 गडकिल्ले सर करणा-या वैभव कोमलवार यांचा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, किरण बुटले, सविता कांबळे, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.
जागतिक वारसाकरीता गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्यचा प्रस्ताव युनेस्कोकडे : छत्रपतींनी बांधलेले 12 गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्य याचा प्रस्ताव युनेस्कोकडे वारसा म्हणून घोषित करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाकडे 12 राज्यातून 400 च्या वर प्रस्ताव आले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्याचा प्रस्ताव निवडला आणि तो युनेस्कोच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. यावर्षी युनेस्कोची मिटींग भारतात आहे. जागतिक वारसा म्हणून शिवरायांचे गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्य याला मानांकन मिळेल, असा आशावाद मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
माँ जिजाऊ व छत्रपतींची वेशभुषा ठरली आकर्षण : शिवजयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने माँ जिजाऊ व छत्रपतींची वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात माँ जिजाऊ आणि बाल शिवाजीच्या वेशभुषेत असलेली शालेय मुले गिरनार चौकापासून गांधी चौकापर्यंत रस्त्याच्या बाजुला उभी राहून ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जल्लोष करीत होती. त्यांच्या गर्जनेने सर्व परिसर दुमदुमला. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेशभुषेतील बालकांचे विशेष कौतुक केले. तसेच उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाचेही अभिनंदन केले.