3 मार्च रोजी चंद्रपूरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन Ø विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Ø विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.18 : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दि. 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी केले आहे.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्ये आहे. लोक न्यायालयाचा महत्वाचा फायदा म्हणजे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरीत सक्षम निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामाऐवढेच महत्व असते. त्यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होते. वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो. तसेच सर्व पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय. ॲक्ट, बँकांची कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक – भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीजबील आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबचे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी केले आहे.