भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन 

            भंडारा,दि.15 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

            या योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा, विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा, जिल्ह्याच्या हद्दीपासून 5 कि.मी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा, विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा, इयत्ता 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा, इयत्ता 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के (उत्तीर्ण) गुण असावे, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौद्ध) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल व गुणांची टक्केवारी 40 टक्के इतकी असावी लागते.

            चालु वर्षासाठी सन 2023-24 या शैक्षणिक सत्रातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी www.swadharyojana.com यासंकेतस्थळावर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून अर्जाची प्रत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात सादर करावा.

            ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, नागपूर विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, यांनी कळविले आहे.