मातृशक्ती वाढवतेय चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मातृशक्ती वाढवतेय चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

घुग्घुस येथे मकर संक्राती सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तेजश्री प्रधान यांची उपस्थिती

घुग्घुस दि.०९ : ‘महाराष्ट्राचे वर्णन कायम ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ असे केले जाते. हा महाराष्ट्र चांद्याशिवाय अपूर्ण आहे. आणि या चंद्रपूर जिल्ह्याची शान वाढविण्याचे, या जिल्ह्याचा गौरव वाढविण्याचे काम मातृशक्ती करीत आहे. त्यात घुग्घुसचे योगदान मोठे आहे,’ असे गौरवोद्गार काढत वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘घुग्घुस की नारी… हर बात मैं भारी’ या शब्दांत कौतुकही केले.*

घुग्घुस येथील प्रयास सखी मंचतर्फे मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मकर संक्रांती उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम तथा महिला संमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि.८ फेब्रुवारी) करण्यात आले. केमिकल नगर येथील प्रयास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो विवेक बोढे, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, वेकोली चे महाव्यवस्थापक आभास सिंह, लॉयड मेटल प्लांट हेड संजय कुमार, पवन मेश्राम, प्रयास सखी मंचच्या मुख्य मार्गदर्शिका सौ. अर्चनाताई भोंगळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, नीतू चौधरी, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे, नंदा कांबळे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, संजय तिवारी, सिनू इसारप, साजन गोहने, विनोद चौधरी, हसन शेख, रत्नेश सिंग आदी उपस्थित होते.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर ही वाघ आणि वाघिणीची भूमी आहे. आज तेजश्री प्रधान यांच्या रुपाने अभिनयातील वाघीण आपल्या दर्शनासाठी आली आहे. या सोहळ्याला नजर जाईल तेथवर मातृशक्ती दिसत आहे. इथे गर्दी आहे आणि दर्दीही आहेत. घुग्घुसवर मी जेवढे प्रेम केले, त्यापेक्षा जास्त प्रेम मला येथील नागरिकांनी दिले. गेल्या वर्षभरात मी अनेक चित्रपटांना अनुदान दिले. पण आज येथील मातृशक्तीने सादर केलेले नृत्य, त्यांनी सादर केलेल्या कला बघून, येथील कलावंतांना सोबत घेऊनच एखादा चित्रपट करावा की काय, असा विचार माझ्या मनात आला. घुग्घुस येथील माता-भगिनींसह सर्व नागरिकांना खूप आनंदी ठेवावे, अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो.’ यावेळी त्यांनी देवराव भोंगळे आणि विवेक बोढे यांच्या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक करत यांच्या सारखे कार्यकर्ते मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

*सुधीरभाऊंचे काम बघून अभिमान वाटला – तेजश्री प्रधान*

चंद्रपूर जिल्ह्यात आल्यानंतर सुधीरभाऊंच्या कामाचा अवाका आणि व्याप कळला. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची झलक इथे बघायला मिळाली. त्यामुळे हा जिल्हा खूप चांगल्या हातांमध्ये असल्याचा मला अभिमान वाटतो, अशी भावना सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने व्यक्त केली. ‘आम्ही टीव्हीवर येतो. मोठा प्रेक्षकवर्ग आम्हाला बघत असतो. पण आज एवढा मोठा प्रेक्षकवर्ग घुग्घुसमध्ये प्रत्यक्षात बघायला मिळाला, त्यासाठी मी सुधीरभाऊंचे आभार मानते. सगळ्या महिला घरचा सोहळा असल्याप्रमाणे इथे आलेल्या आहेत. यावरून आपल्या कामातून आपण किती लांबपर्यंत पोहोचत असतो, याची प्रचिती आली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात इतके छान काम सुरू आहे, याचा आनंद वाटतो,’ असेही त्या म्हणाल्या. कुठलेही चांगले काम करण्यासाठी चेतनेची ठिणगी लागत असते. मा.सुधीरभाऊ ही ठिणगी होऊन आपल्या सर्वांच्या पाठिशी आहेत, याचा आनंद असल्याचे तेजश्री प्रधान म्हणाल्या.