बांबू फर्निचर प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरुणांना मिळाले रोजगाराचे साधन
Ø 30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रम
चंद्रपूर, दि.07 : झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली च्या वतीने 30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मल्लेलवार, प्रशिक्षणाचे तांत्रिक मार्गदर्शक शिरीष कनेर, किशोर गायकवाड, राजू हजारे, शशिकांत मोकाशे, वनपाल कोसनकर व संस्थेचे विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींना विविध यंत्रसामुग्री हाताळणे, विविध आकृतीज्ञान व जीवनापयोगी फर्निचर तयार करण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शनाबरोबरच उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय योजना व बँकिंग क्षेत्रातील वित्त पुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली. सर्वसामान्य जीवनात बांबूवर आधारीत वस्तूंचा जास्तीत जास्त वापर वाढावा व त्यातून युवकांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात महाराष्ट्राच्या 10 विविध जिल्ह्यातील सहभागी 15 युवक-युवतींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी बांबू दूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत राहून बांबूक्षेत्राची प्रचार-प्रसिद्धी करावी, असे मार्गदर्शन केंद्राचे संचालक अशोक खडसे यांनी यावेळी केले. प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविध बांबू वस्तूची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. बेरोजगार युवकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराचे साधन मिळाल्याचा विश्वास प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केला.