गटशेतीचे चांगले काम करणाऱ्याना प्राधान्याने निधी –जिल्हाधिकारी
चंद्रपूर,दि.01: गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गटांना प्राधान्याने निधी वितरीत करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज कृषी विभागाला दिल्या.
मिशन जयकिसान व गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजनेचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक रविंद्र ठाकरे, प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, वैनगंगा व्हॅलीचे नरेंद्र जिवतोडे तसेच गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हयात 2017-18 मध्ये नऊ व 2018-19 मध्ये आठ असे एकुण 17 गटांची निवड उपरोक्त योजनेंतर्गत करण्यात आली असून सदर गटांना शेतकरी प्रशिक्षण, शेती अवजारे वितरण, गोडावून बांधकाम, प्रक्रिया केंद्र निर्मिती, विपणन व्यवस्था, ट्रॅक्टर व इतर अनुषंगिक बाबींसाठी अनुदान देण्यात येवून सक्षमीकरण करण्यात येते. या गटांना आतापर्यंत 4 कोटी निधी वितरीत करण्यात आला असून प्रलंबित कामांसाठी 1 कोटी 71 लाख रुपये निधीची मागणी संबधित गटांकडून करण्यात आली आहे. यानुसार,राज्य शासनाकडुन प्राप्त निधी संबधितांना वितरीत करावा व अपुरा पडणारा निधी सादर केलेल्या आराखड्यानुसार इतर स्त्रोतातुन वितरीत करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.