औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेची काळजी घ्यावी
-जिल्हाधिकारी विनय गौडा
चंद्रपूर, दि.01: जिल्ह्यात एकुण 193 औद्योगिक कारखाने आहेत. या कारखान्यात अतिधोकादायक ते सर्वसाधारण रसायने वापरली जातात. यापासून कोणतीही जिवितहानी किंवा अपघात होवू नये यासाठी नियमानुसार सुरक्षिततेविषयक उपाययोजनांची अमंलबजावणी करुन औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत, अरिष्ट समूहाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक शरद धनविजय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सुरवाडे तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध औद्योगिक कारखाने आहे. या कारखान्यांमध्ये कोणकोणती धोकादायक रसायने वापरली जातात यांच्या माहितीसह रसायनांची यादी तयार करावी. उद्योगांनी त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा साहित्यांची माहिती घ्यावी. मनुष्यहानी व इतर हानी टाळण्यासाठी उद्योगांनी सुरक्षाविषयक साहित्याचा आढावा घ्यावा व सुरक्षा नियमावलीचे पालन करावे. कारखान्यामध्ये अपघात होता कामा नये याबाबत दक्षता घ्यावी व नियमित पाठपुरावा करावा.आपात्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी संबंधित यंत्रणाची संपर्कप्रणाली अद्यायावत ठेवावी. तसेच अग्निरोधक व्यवस्था, सुरक्षेसाठी वापरले जाणारे कालबाह्य साहित्य मुदतीपुर्वी बदलवुन घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.