मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ दिवसांची मुदतवाढ
चंद्रपूर ३१ जानेवारी – मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असुन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण दरम्यान मनपा हद्दीतील सर्व निवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत असून भडेकरू कुटुंबाचे सुद्धा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित प्रगणक यांना देण्यात आल्या आहे.दरम्यान ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण १ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकले नाही अशा कुटुंब प्रमुखांनी मनपा मुख्य झोन कार्यालय,क्षेत्रीय कर निरीक्षक अथवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी दि.२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणास आता २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४९ पर्यवेक्षक व ७३९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असुन सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरासुद्धा घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेत आहेत.
शहरात सदर सर्वेक्षण होत असल्याची माहिती ध्वनी यंत्रणा,वृत्तपत्रे,समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली असुन प्रत्येक प्रगणकाद्वारे सरासरी १०० घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी,उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींचा सामना करीत मनपा व इतर शासकीय कर्मचारी हे पुर्ण क्षमतेने कार्य करत आहेत. सर्वेक्षणादरम्यान जर कुठल्या कुटुंबाचे सर्वेक्षण अद्याप झाले नसेल किंवा त्या कालावधीत ते घरी नसतील अथवा इतर कुठल्याही कारणाने सर्वेक्षण झाले नसेल तर अश्या कुटुंब प्रमुखांनी आपले क्षेत्रीय कार्यालय किंवा आपल्या क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त, कर निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.