गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
चंद्रपूर, दि.29:जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, अधिष्ठाता डॉ. कांबळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, सहाय्यक सल्लागार कैलाश उईके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्राची माहिती अदयावत ठेवावी. जिल्ह्यात एक व दोन मुलीवर किती गर्भपात झाले? याची काटेकोरपणे तपासणी करावी व याबाबत सखोल माहिती घ्यावी. संबंधित यंत्रणेने जिल्ह्यातील तसेच मनपा क्षेत्रातील प्रत्येक सोनोग्राफी केंद्राला भेट देऊन तपासणी करावी. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, पोलीस विभागाने बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घ्यावी. सदर केंद्र दोषी आढळून आल्यास पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कार्यवाही करावी.
जिल्ह्यातील स्त्री-पुरुषांचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लिंगनिदान होत असल्यास कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्रावर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा कृती दल समितीचा आढावा:
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळा व महाविद्यालय स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
सदर मोहीम 13 फेब्रुवारी तर मॉप अप दिन 20 फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी उपलब्ध ठेवावी. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्याबाबत नियोजन करावे. शाळाबाह्य विद्यार्थी देखील सुटता कामा नये. जंतनाशक गोळ्या वितरित करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा तालुकानिहाय टेबल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी संबधित यंत्रणाना दिल्या.