निसर्ग चित्राने सुंदर केला शाळा परिसर
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज अकस्मात दवडीपार बाजार येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट दिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे काम यावेळी शाळेत सुरू होते. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या अभियान अंतर्गत दवडीपार शाळेतील भिंतीवर खूप चांगल्या पद्धतीची निसर्गचित्रे रेखाटले गेलेली आहेत. एक प्रकारे मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात शाळेच्या भिंती देखील बोलू लागले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय अशा एकूण 1297 शाळांमध्ये मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
या अभियानात सर्व शाळांनी विविध उपक्रम राबवून सहभागी व्हायचे आहे.1 लाखापासून 51 लाखांपर्यतीची बक्षिसे उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या शाळांना दिली जाणार आहेत.अधिकाधिक शाळांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत शिक्षण विभागाची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले .
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या विद्यार्थीकेंद्रित अभियानाचा कालावधी 45 दिवसांचा आहे.आरोग्य आर्थिक आणि कौशल्य विकासावर यातून भर दिला जाणार आहे.भौतिक सुविधा पर्यावरण संवर्धन,सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व अन्य अभियान उपक्रमातून राबविले जाणार आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे,अध्ययन-अध्यापन आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानांच्या वापराला प्रोत्साहन देणे,शिक्षणासाठी पर्यावरणपूरक आणि आनंददायी वातावरण निर्मिती करणे,क्रीडा,आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे.
सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.विजेत्या शाळांना रोख पारितोषिक दिली जाणार आहेत.याबाबतचा शासन निर्णयही प्रसीध्द झाला आहे.
शाळांमधील शिक्षक,पालक विद्यार्थी,माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी,तसेच स्पर्धात्मक वातावरण मिळावे,यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्याव्दारे हे अभियान राबविले जात आहे.
प्राथमिकस्तरावर केंद्र प्रमुख,जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, खाजगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सेवाज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यापालन अधिकारी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित उपशिक्षणाधिकारी तसेच राज्यस्तरावर निर्देशित अधिकारी मूल्यमापन करतील.
या अभियानासाठी शाळांची अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा,उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात येणार आहे.प्राथमिकापासून राज्यस्तरापर्यत प्रत्येक स्तरातील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहेत.तालुका,जिल्हा तसेच विभागीय पारितोषिके दिली जाणार आहेत.राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी पहिले पारितोषिक 51 लाख रुपये,दुसरे पारितोषिक 21 लाख रुपये आणि तिसरे पारितोषिक 11 लाखांचे राहणार आहे.