तांत्रिक बाबींची पूर्तता करुन फ्लाईंग क्लब फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु करा – ना.सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत येथील फ्लाईंग क्लब सुरु होईल, यापद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यापूर्वी दिनांक 26 जानेवारी रोजी फ्लाईंग क्लब सुरु करण्यासंदर्भांत कार्यवाही अपेक्षित होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे जरी उशीर होणार असला तरी ही प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन चंद्रपूरवासियांच्या स्वप्नांची पूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, फ्लाईंग क्लबच्या अनुषंगाने ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान तीन शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. सीएसआर फंडातून उद्योगपती कडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.