शाळांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करावे
Ø 25 जानेवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
चंद्रपूर दि. 10: समाज कल्याण कार्यालयांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यात येतात व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ अदा करण्यात येतो. तसेच दिव्यांगाच्या बाबतीत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर अशा दोन्ही शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना लाभ अदा करण्यात येते.
समाजकल्याण कार्यालयातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना:
अनुसूचित जातीच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती देणे. अनुसूचित जातीच्या मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देणे. अनुसूचित जातीच्या इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे. अस्वच्छ काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती. इयत्ता 9वी ते 10वीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती. वर्ग 1ली ते 10वी मधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती. डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती. इयत्ता 5वी ते 7वी तसेच 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क देणे(विजाभज/विमाप्र), इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या (विजाभज/विमाप्र)विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. माध्यमिक शाळेतील (विजाभज/विमाप्र) विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती देणे. इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या (विजाभज/विमाप्र) प्रवर्गाच्या मुलींना शिष्यवृत्ती, आणि 10वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.
सदर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज अजूनही बऱ्याच शाळांकडून अप्राप्त आहे. विशेषतः दिव्यांग शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच ज्या पात्र मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप या कार्यालयास सादर केले नाही, अशा जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांनी त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या आणि शिष्यवृत्तीच्या योजनेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज 25 जानेवारी 2024 पर्यंत समाजकल्याण कार्यालयात सादर करावे. अर्ज स्वीकारण्याची मुदत पुनश्च वाढविण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी कळविले आहे.